प्रत्यक्षात कोणकोणते प्रकार घडले?
आता या दोन जिल्ह्यातील अनेक गावात प्रत्यक्षात काय काय घडत होते, हे या समितीच्याच शब्दात पाहा -
(१) स्त्रियांचे मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी, घरातील पैसे कपडे अशा वस्तू एकदम अदृश्य होत. काही कालानंतर त्या पुन्हा परतही येत.
(२) कपडे आपोआप जळत व फाडले जात.
(३) कुंकू, हळद, लिंबे (काहींत खिळे घातलेले), बिब्बे आढळून येत.
(४) घरावर दगड येऊन पडत.
(५) झाडे वाळून जात.
(६) हुमनाबाद या शहरात एक विलक्षण प्रकार घड़े तो असा एका घराचा दरवाजा जोरात ढकलला की शेजारच्या इतर दरवाजातून ढकलल्याचा आवाज निघे.
या भानामतीचा अभ्यास करून समितीने जो निष्कर्ष काढला आहे, तो या समितीच्याच शब्दात पाहा -
"या भानामतीचे बळी बनलेल्या बऱ्याच लोकांची सखोल तपासणी केल्यानंतर व या भानामतीच्या उपलब्ध घटनांची काळजीपूर्वक छाननी केल्यानंतर या शोधसमितीने असा एकमुखी आणि ठाम निष्कर्ष काढला आहे, की ही तथाकथित भानामती कोठल्याही अज्ञात शक्तीने घडून येत नाही." (हा निष्कर्ष समितीने अधोरेखित केला आहे.)