Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details


प्रस्तुत लेखकाने हे तीन ग्रंथ लिहिताना हीच भूमिका घेतली आहे. वैज्ञानिक संशोधनातून उपलब्ध होणारे वस्तुनिष्ठ पुरावे सादर करणे हेच हे तीन ग्रंथ लिहिण्यामागचे उद्दिष्ट आहे. हे करीत असताना लेखकाला स्वाभाविकच आक्रमक भूमिका घ्यावी लागली आहे. हा सत्यासाठी लढा असल्याने लढ्यात आक्रमक भूमिका घेणे अपरिहार्यच ठरते. विज्ञान हे तटस्य असते हे खरे असले, तरी विज्ञानाच्या नावाखाली असत्याचे प्रतिपादन व प्रसार तटस्थपणे पाहणे कसे शक्य आहे? तथापि ही आक्रमक भूमिका वैयक्तिक पातळीवरची नाही. असणे शक्य नाही. कारण सत्य काय व असत्य काय हा कोणाचाही वैयक्तिक प्रश्न नाही.


शेवटी हे तिन्ही ग्रंथ वाचकांनी वाचल्यानंतर त्यांना एकच विनंती करावयाची आहे. ती ही की त्यांनी स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षाला येऊ नये मनुष्य हा शेवटी अपूर्ण आहे. त्याच्या शक्ती मर्यादित आहेत. त्याला सर्व विषयांचे ज्ञान मिळवणे व सर्व क्षेत्रातील अनुभव घेणे शक्य नाही. अशा परिस्थितीत. किमान वैज्ञानिक पथ्य पाळले पाहिजे. हे किमान वैज्ञानिक पथ्य म्हणजे प्रत्यक्ष पुराव्याशिवाय कोणत्याही ठाम निष्कर्षाला न येणे.

येथे लक्षात ठेवावयाची गोष्ट ही की एखाद्या गोष्टीत पुरावे मिळत नाहीत हे त्या गोष्टीच्या सत्यासत्यतेविषयीच्या ठाम निष्कर्षाला येण्याचे कारण होऊ शकत नाही. पुरावे न मिळणे, ते नसण्याचा पुरावा होऊ शकत नाही. (The absence of evidence is no evidence of absence.) तो आपल्याच मर्यादांचा पुरावा असू शकतो. आपल्या (अनेक कारणामुळे आलेल्या) मर्यादा न ओळखता ठाम निष्कर्ष काढणे, हा (अ) वैज्ञानिक अहंकार आहे नव्हे खोट्या वैज्ञानिकपणाची ती घमेंड (hubris) आहे. आणि एक मोठे वैज्ञानिक पातकही! कारण त्यामुळे विज्ञानाचे ध्येय जे सत्यशोधन त्याचाच पहिला बळी जातो.