'ज्योतिषशास्त्र खरे ठरले तर समिती बरखास्त करू' इति अंनिस -
महाराष्ट्रातील अंनिसची स्थापना समाजात ज्ञानाचा वा विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झालेली नसून विशिष्ट मत प्रचार व तद्द्वारा सवंग वृत्तपत्रीय प्रसिद्धी मिळविण्यासाठी झालेली असल्याचे एव्हाना जाणत्या लोकांना कळून चुकले आहे. एखाद्या राजकीय पक्षाने राजकीय स्वार्थासाठी 'गरिबी हटाव'ची घोषणा द्यावी, तसे या समितीने स्वतः च्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी व प्रसिद्धीसाठी 'अंधश्रद्धा निर्मूलना'ची घोषणा दिली आहे.
फलज्योतिष हा प्रकार चमत्कारात मोडत नसल्यामुळे 'आम्ही सांगू त्या अटीखाली चमत्कार करून दाखवा' असे म्हणून असंभाव्य अटींचा घोळ घालून कालहरण करण्याचा जो निंद्य प्रकार अंनिसचे लोक नेहमी करतात, तो येथे शक्य नसल्यामुळे आव्हान प्रक्रियेतून पळ काढण्याचा त्यांचा नेहमीचा मार्ग खुंटतो. दुसरी फलज्योतिषविषयक जमेची बाजू अशी, की फलज्योतिष ही अंधश्रद्धा आहे असे म्हणून ज्योतिष सांगणाऱ्यावर बुवाबाजीचा वा फसवणुकीचा आरोप त्यांना करता येत नाही. असा आरोप करायचाच झाला तर ज्या वृत्तपत्रांतून हे लोक आपली प्रसिद्धी मिळवतात त्या आठवड्याचे भविष्य देणाऱ्या) वृत्तपत्रांवर त्यांना प्रथम हा आरोप करावा लागेल व त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडावी लागेल. हा त्यांचा आत्महत्येचा मार्ग असल्याने तो ते कधीच अवलंबणार नाहीत. पण वस्तुतः ज्योतिषामध्ये कसलीही फसवणूक वा बुवाबाजी नाही. फसवणूक म्हणजे सत्य लपविणे होय. येथे सत्य भविष्याच्या पोटात असल्यामुळे ते कोणालाही खुद्द ज्योतिषालाही माहीत नसते. ते लपविणे राहोच, उलट ते उघड करून सांगण्याचाच ज्योतिषी प्रयत्न करतो. त्यामुळे फसवणुकीचा किंवा रूढार्थाने कोणाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. तात्पर्य, ज्योतिष फसवणुकीला वाव देणारी अंधश्रद्धा ठरत नाही.