More Details

शंका - संचित कर्मातील कोणती कर्मे फलोन्मुख (प्रारब्ध) व्हावीत हे कोण ठरविते ? संचितकर्म अचेतन असल्यामुळे ते ठरवू शकणार नाही. जीवही ठरवू शकणार नाही. कारण त्याला संचित कर्मच माहीत नाही. ईश्वरही ठरवू शकणार नाही. कारण तो अन्य कामे सोडून हा खटाटोप कशासाठी करील ? 

उत्तर - निर्गुणातून म्हणजे 'ज्ञान' आत्म्यातून सगुणाचा म्हणजे 'अज्ञान' आत्म्याचा कसा जन्म झाला, हा सर्वात गहन प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवला तर 'ज्ञान' व 'कर्म' याच्या संबंधाचा प्रश्न सोडविल्यासारखे होईल. पण हा न सुटणारा प्रश्न आहे. म्हणून भगवद्गीता ‘किं कर्म किमकर्मेति कवयाऽप्यत्र मोहिताः ।' म्हणजे कर्म (अज्ञान) कोणते व अकर्म (ज्ञान) कोणते याविषयी ज्ञानी लोकही संभ्रमात आहेत असे म्हणते व शेवटी ‘गहणा कर्मणो गतिः । (कर्माचे ज्ञान अगम्य आहे) असा निर्णय देते ! हा गीतेचा निर्णय ‘अस्याध्यक्षः.... अंग वेद यदि वा न वेद' (या सृष्टीचा निर्माता तरी हे जाणतो काय ? की न जाणतो ? हे कुणी सांगावे.) या ऋग्वेदातील नासदीयसूक्ताच्या कर्त्याच्या निर्णयाशी मेळ खाणाराच आहे. म्हणून वेदांताने ‘अगा जे झालेच नाही त्याची वार्ता पुसशी काई ?' असे म्हणून ‘अजातवादाचा पुरस्कार केला आहे. आणि ज्ञानेश्वरांनीही ‘अमृतानुभवात ‘अज्ञाना' बरोबरच (कर्माबरोबरच) अज्ञान सापेक्ष ज्ञानाचेही (कर्माबरोबर जन्मलेल्या जीवात्म्याचेही) खंडन केले आहे. (अर्थात् अज्ञाननिरपेक्ष ज्ञान-परमात्मा-अखंडच आहे हे सांगणे नको.)