प्रथमतः हे मी स्पष्ट करू इच्छितो की वैज्ञानिक निकषांवर कोणतीही गोष्ट पारखून मान्य करण्याचा अं.नि.स. चा दृष्टिकोन कोणाही सूज्ञास योग्य वाटेल असा असल्याने अ'.नि.स. च्या कार्याचा मला आदर आहे. आपण आपल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे नाडी ग्रंथ परिक्षणावरून निर्माण होणाऱ्या दोन गंभीर निष्कर्षांमुळे अं.नि.स. च्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पायाच हादरेल अशी परिस्थिती आहे खरी.
आपण म्हणता त्याप्रमाणे दहा जणांच्या अंगठ्यांची प्रथम आणि आणखी दहा जणांच्या, अशी वीस जणांच्या अंगठ्यांच्या ठशांची चाचणी करून त्यांच्या प्राथमिक माहितीच्या अचूकतेची जाहीर खात्री झाली की जर अं.नि.स. चे नाडी भविष्याबद्दलचे मत नक्की बनणार असेल तर आपणास बरोबर येताना ५ लाखाचा ड्राफ्ट घेऊनच यावे लागेल अशी परिस्थिती आहे. कारण आत्तापर्यंत हजारो वर्षांत करोडो लोकांनी आपआपल्यासंबंधीची माहिती तंतोतंत जुळते आहे हे अनुभवले आहे. रोज नाडी केंद्रात ज्या व्यक्तीच्या पट्ट्या निघतात त्याची प्राथमिक माहिती १००% बरोबर असल्याची खात्री त्या व्यक्तीने दिल्याशिवाय वही लेखन व टेप तयार केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे.