सन्मानीय डॉ विजय बेडेकर यांसी
सप्रेम नमस्कार,
आपण आपल्या 'सत्य शोध संस्थे' तर्फे वितरित केलेले नाडी भविष्यासंबंधीचे निवेदन मिळाले.आपण स्थापन केलेल्या संस्थेचे नामानिधान सार्थ करण्यासाठी हे काम करणे अगत्याचे आहे. आपणच या कामास योग्य असून आपल्याकडे त्यासाठी लागणारी साधनसंपन सुविधा आहे. विज्ञानाच्या नावावर सत्याचा अपलाप करणारी व महाराष्ट्रातील सर्व वृतपत्रांना आपल्या कह्यात घेऊन या कामास जुंपणारी 'अंनिस' संस्था आहे. या भारतीय संस्कृतीच्या व धर्माच्या विरोधात विज्ञानाच्या नावावर उभ्या असलेल्या धर्मलंड संस्थेला तोडीस तोड प्रत्युतर देणारी संस्था तितक्याच सामथ्याने उभी असणे ही काळाची गरज आहे. हे काम आपली संस्था करू शकेल असा माझा विश्वास आहे.
मूठभर असले तरी 'अंनिस' च्या लोकांची जशी संघटना आहे तशी त्यांच्या विरोधात असलेल्या लोकांची संख्या प्रचंड असली तरी त्यांची संघटना नसल्यामुळे व अंधश्रद्धेच्या विरोधात असणे - मग खरी अंधश्रद्धा कोणती व श्रद्धा यात काय फरक याचा विचार काही का असेना- हे प्रगतीचे लक्षण मानले गेल्यामुळे, वृतपत्रेही त्या कारणासाठी त्या मूठभर अविचारी लोकांचाच पाठपुरावा करीत असल्यामुळे 'अंनिस' च्या विरोधात असलेल्या लोकांना प्रवाहाविरुध्द पोहण्याचे कष्ट घ्यावे लागणार आहेत, हे ओळखून त्यांनी संघटित होण्याची व आपला आवाज वाढविण्याची गरज आहे. अशा लोकांचे संघटन नसल्यामुळे सत्य हेच असत्य व असत्य हे सत्य निदान वरवर तरी ठरू पाहत आहे. (वरवर म्हणण्याचे कारण बरेच 'अंनिस' ला पाठिंबा देणारे लोक खाजगीत त्यांच्या विरुध्द बोलताना आढळतात) विज्ञानाच्या नावाखाली हे सत्यलापाचे काम 'अंनिस' केवळ संघटनेच्या बळावर करीत आहे, हे ओळखून त्याविरुध्दच्या लोकांनाही आपली संघटना बांधण्याची गरज आहे. अशा संघटनेला आपली संस्था हे स्फुर्तिस्थान व केंद्रस्थानही ठरेल असे वाटते. कोणी तरी एखाद्या व्यक्तीने या कामी पुढाकार घेणे आवश्यक असून ते काम आपण करावे असे सुचवावेसे वाटते. आपण प्राचीन भारतीय विद्येच्या विविध क्षेत्रांत संशोधन करण्यास ज्याप्रमाणे 'सेमिनार्स' च्या द्वारा प्रोत्साहान देता तसे या कामासाठीसुद्धा 'अंनिस' विरोधी लोकांच्या वर्षातून एक दोन बैठका वा 'सेमिनीर्स' घ्याव्यात व या कामास प्रोत्साहन द्यावे.