ऐतिहासिक पार्श्वभूमी
येसूबाईंचे माहेरचे नाव - जिऊबाई, पिलाजीराव शिर्के वडील, चिमाबाईंच्या आई. श्रृंगारपूर गावाचे सरदार.
वाघोजी, गणोजी, संभाजी, देवजी, हे जिऊबाईचे वरिष्ठ बंधू.
येसूबाईंचे आजोबा आईचे वडील - सूर्याजीराव सुर्वे. संगमेश्वरचे आदिलशाहीतील संस्थानिक होते. जुनी जमीनदारी पद्धत शिवाजी महाराजांनी बन्द केल्यामुळे रुष्ट झालेल्या अनेक संस्थानिकांपैकी सुर्वे होते.
शिवाजी महाराजांनी सुर्व्यांची नात जिऊबाई हिचा विवाह संभाजी या पुत्राशी लावून, व आपली मुलगी गणोजी शिर्के यास देऊन नाते संबंध निर्माण करून दुरावा सांधण्याचा प्रयत्न केला.
परंतु यातून अपेक्षित दिलजमाई होऊ शकली नाही. या उलट मराठा आणि इतर नातेवाईकांनी शत्रुत्व मनात बाळगून संभाजीराजे यांचा संगमेश्वरातील ठावठिकाणा गुप्तपणे मुगल सरदार मुकर्रबखानाला कळवून पकडून देण्यात मदत केली. नंतर संभाजीराजे आणि कवी कलश यांना यातनामय मरण आले.
स्वराज्याची राजधानी रायगड मुगलांच्या हाती गेल्यावर त्यांनी आणीबाणीची परिस्थिती ओळखून शिवाजी महाराजांचे घाकटे पुत्र राजाराम यांचा राज्याभिषेक करून दक्षिण भारतातील जिंजीकडे प्रयाण करून राज्य रक्षणासाठी साहसी पाऊल उचलले.
आपला मुलगा शिवाजी उर्फ शाहू व अन्य राजांचे नातलग, कारभारी यांना मुगलांनी आपल्या देखरेखीत नजरकैदेत ठेवले. पुढे औरंगजेबाच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सत्ता संघर्षावेळी शाहू महाराजांची सुटका केली गेली. मात्र येसूबाईंना दिल्लीला पुढे १९ वर्षे राहावे लागले. मुगल सत्ता खिळखिळी होऊन ऱ्हासाला लागली. येसूबाई नंतर ११ वर्षे जगल्या. त्यांचे स्मृती तुळशी वृंदावन साताऱ्याजवळ माहुलीला नदी काठी आहे.